न्यू इंग्लिश स्कूल, पुणे : विद्येच्या माहेरघराचा पाया
Posted on April 4, 2025
श्री. योगेश पाटील
शिक्षकप्रास्ताविक :
दिनांक २ फेब्रुवारी १८३५ रोजी लॉर्ड मेकॉले यांनी इंग्लंडच्या संसदेतील भाषणामध्ये सांगितले, 'मी संपूर्ण भारत देश उभा आडवा फिरून पाहिला परंतु मला या देशामध्ये एकही भिकारी दिसला नाही. यामागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजेच या देशातील उदात्त मूल्ये. आपल्याला या देशाला हजारो वर्षे पारतंत्र्यात ठेवायचे असेल तर आपल्याला या देशातील शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल. आपल्याला असे शिक्षण द्यावे लागेल ज्यामुळे भारतीय लोक वर्णाने भारतीय व अंतरंगाने इंग्रज होतील.' याप्रमाणे शिक्षणव्यवस्था राबविण्यास इंग्रजांनी सुरूवात केली. या इंग्रजी धोरणास भारत देशामधून पहिल्यांदा आव्हान देणारी शाळा 'न्यू इंग्लिश स्कूल, पुणे' ही आहे.
वास्तविकत: १८६० साली वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे व लक्ष्मण नरहर इंदूरकर यांनी पुण्यामध्ये खाजगी वर्ग चालवण्यास घेऊन खाजगी वर्गांची 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' या संस्थेची स्थापना केली होती. हीच संस्था भावी काळामध्ये 'महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे' या नावाने प्रसिद्ध झाली. पुणे व बारामती परिसरामध्ये या संस्थेने शैक्षणिक कार्य केले आहे. ही शाळा शासकीय सहाय्यावर चालत असे.
मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सुधारक गोपाळ गणेश आगरकर व फत्तेसिंग माधवराव महादेव बल्लाळ नामजोशी यांनी 'न्यू इंग्लिश स्कूल, पुणे'. या ऐतिहासिक शाळेची स्थापना केली. संस्थापकांच्या सामाजिकदृष्ट्या आदर्श स्थानामुळे लवकरच त्यांच्या नावाचे आदर्श घेऊन नवनवीन शाळा व संस्था स्थापन होऊ लागल्या.
सूचनक शब्द : न्यू इंग्लिश स्कूल, नूतन मराठी विद्यालय, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, दादर इंग्लिश स्कूल मुंबई, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ पुणे (S.N.D.T.), मॉडर्न विद्यालय पुणे, ज्ञान प्रबोधिनी, पुणे.
१] शाळा : नूतन मराठी विद्यालय (नू.म.वि.)
संस्था : शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे.
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमालेच्या लेखनातून भारतीयांचा स्वाभिमान जागृत करत असताना ‘स्वभाषा’ हे तत्व वापरले मात्र १ जानेवारी १८८० रोजी शाळा स्थापन करताना नवीन काळाची गरज लक्षात घेता ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ या शाळेची स्थापना केली. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी विद्यार्थी व पालक यांना आकर्षित करण्यासाठी ‘इंग्लिश’ विषय शिकवला जात असलेली शाळा सुरू केली. शाळा नावलौकिक प्राप्त करू लागली मात्र १७ मार्च १८८२ रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे निधन झाले. त्यांच्या मनातील ‘स्वभाषा’ या विचारावर आधारित शाळा निर्माण करण्याचे श्री. रामचंद्र गोपाळ देव, श्री. दामोदर सदाशिव करंबेळकर, श्री. रामचंद्र भिकाजी कुलकर्णी व श्री. कृष्णाजी बळवंत डोंगरे यांनी ठरवले.
न्यू इंग्लिश स्कूल, पुणे या शाळेच्या वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे श्री. वामन शिवराम आपटे, श्री. बाळ गंगाधर टिळक, श्री. गोपाळ गणेश आगरकर व श्री. महादेव बल्लाळ नामजोशी यांनी आपली शाळा मोरोबादादा वाड्यामधून स्थलांतरित करून १ जानेवारी १८८३ पासून गद्रे वाडा, पुणे येथे भरवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेल्या शाळेच्याच जागेवर त्यांच्याच विचारांची ‘नूतन मराठी विद्यालय’ ही शाळा १ जानेवारी १८८३ रोजी सुरू करण्यात आली.
ज्याप्रमाणे ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ही शाळा स्थापन केल्यानंतर पाच वर्षांनी ‘डेक्कन एज्यूकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना करण्यात आली त्याचप्रमाणे ‘नूतन मराठी विद्यालय’ या शाळेच्या स्थापनेनंतर पाच वर्षांनी ५ फेब्रुवारी १८८८ रोजी ‘शिक्षण प्रसारक मंडळी’ या संस्थेची स्थापना करण्यात आली.
आज शाळेस १४१ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या ऐतिहासिक शाळेच्या व संस्थेच्या स्थापनेचा पाया ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ ही शाळा आहे.
२] विद्यापीठ : डी.इ.एस. पुणे विद्यापीठ
संस्था : डेक्कन एज्युकेशन सोसायटी.
‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ शाळेचे सूपरिटेंडेंट श्री. वामन शिवराम आपटे यांनी ९ सप्टेंबर १८८२ रोजी हंटर कमिशनसमोर साक्ष देत असताना मांडलेल्या काही मुद्द्यांमध्ये ‘व्यवस्थापनात व शिकवण्यात चालकाला पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. अभ्यासक्रम तयार करण्याचे व अभ्यासपद्धती कोणती असावी हे ठरविण्याचे स्वातंत्र्य संस्था-चालकास असावे; फक्त परीक्षेचा दर्जा सरकारने ठरवून द्यावा. स्वभाषेची तरफदारी करण्याच्या संस्था-चालकांच्या धोरणास प्रतिबंध नसावा.’ असे मुद्दे मांडले होते. १३ फेब्रुवारी १८८४ रोजी सर जेम्स फर्ग्युसन यांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ शाळेस दिलेली भेट आणि त्यांनी खाजगी संस्थांना सहकार्य करण्यासाठी घेतलेली भूमिका यानंतर महाविद्यालय स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला परंतु एकाच छत्राखाली शाळा व महाविद्यालय स्थापन करावयाचे असेल तर त्यासाठी संस्थेची स्थापना करणे आवश्यक होते. त्यामुळे शुक्रवार, दिनांक २४ ऑक्टोबर १८८४ रोजी सकाळी ८.३० वाजता गद्रे वाड्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे’ या संस्थेची स्थापना करण्यात आली.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून या संस्थेचे ‘डी.इ.एस. पुणे विद्यापीठ’ सुरू करण्यात आले आहे.
या संस्थेच्या आज पुणे व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ६१ शाखा आहेत. ही संस्था व या विद्यापीठाचा पाया ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ ही शाळा आहे.
३] शाळा : दादर इंग्लिश स्कूल, मुंबई.
संस्था : जनरल एज्युकेशन इंस्टीट्यूट, मुंबई.
श्री. गोपाळ नारायण अक्षीकर हे १८८२ मध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ या शाळेमधून मट्रिक उत्तीर्ण झाले. त्यांनी १८८१ ते १८८४ या काळामध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ ही शाळा ते ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे’ ही संस्था उभारल्याचा काळ पाहिला आणि गोपाळ नारायण अक्षीकर यांनी याच प्रेरणेतून ‘शिक्षणातून स्वावलंबन’ हा उदात्त हेतू समोर ठेऊन ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ या शाळेच्या धर्तीवर १८८९ मध्ये ‘दादर इंग्लिश स्कूल, मुंबई’ या शाळेची स्थापना केली. १८८९ ते १८९२ या चार वर्षांच्या काळामध्ये दादर, कल्याण व ठाणे येथे चार शाळांच्या स्थापनेनंतर १८९२ मध्ये त्यांनी ‘जनरल एज्युकेशन इंस्टीट्यूट, मुंबई’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत मुंबई व ठाणे जिल्ह्यांमध्ये २०११ पर्यंत ४१ शाळांची स्थापना केली आहे.
मुंबईमध्ये शाळांची कमतरता नव्हती मात्र सर्वसाधारण जनतेच्या मुलांसाठी अक्षीकर यांनी शाळा सुरू केली त्यामुळे या शाळेस महत्व आहे. अक्षीकर यांची संस्था मुंबईमध्ये असली तरीही त्याची पाळेमुळे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे आणि येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ही शाळा आहे.
४] शाळा : महिला विद्यालय, हिंगणे, पुणे. (सध्याचे कर्वेनगर)
संस्था : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे.
लोकमान्य टिळक यांनी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे’ या संस्थेचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी गणित विषयाच्या अध्यापनासाठी ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ शाळेतील शिक्षक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना निमंत्रण दिले. कर्वे १८९१ मध्ये शाळा व संस्थेमध्ये रुजू झाले. त्यांनी मुलींसाठी विविध संस्थांची स्थापना सुरू केली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ या शाळेमध्ये १९०६ मध्ये मुलींना प्रवेशही सुरू केला. ४ जानेवारी १९०७ रोजी स्वतंत्रपणे ‘महिला विद्यालय, हिंगणे, पुणे’ (सध्याचे कर्वेनगर) शाळेची स्थापना केली. याच शाळेपासून पुढे ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे’ हा संस्था सुरू केली. पुणे या विद्येचे माहेरघरामधील या ११७ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या संस्थेचा पाया ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ ही शाळा आहे.
५] विद्यापीठ : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, पुणे (S.N.D.T.)
शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक भारतरत्न महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या १९१६ मध्ये देशातील पहिले महिला विद्यापीठ सुरु केले.
६] शाळा : मॉडर्न विद्यालय, पुणे.
संस्था : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे.
श्री. शंकरराव कानिटकर हे ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ शाळेतील शिक्षक १९२४ पासून मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या नियामक मंडळामध्येही त्यांनी महत्वाची भूमिका निभावलेली होती. १९३४ मध्ये श्री. शंकरराव कानिटकर यांनी शाळा व संस्था सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी १९३४ मध्ये मॉडर्न विद्यालय, पुणे शाळा व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे संस्था सुरु केली. पुणे या विद्येचे माहेरघरामधील या ९० वर्षे कार्यरत असलेल्या संस्थेचा पाया ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ ही शाळा आहे
७] शाळा : ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे.
संस्था : ज्ञान प्रबोधिनी, पुणे.
श्री. विनायक विश्वनाथ पेंडसे यांनी कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष ज्ञान देण्यासाठी नवीन संस्था सुरू करायची असे ठरवले. या नवीन शाळेसाठी इमारत नव्हती. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड,पुणे शाळेचे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक श्री. मो. रा. वाळंबे व डॉ. द. न. गोखले यांच्याशी चर्चा केली आणि १९६२ मध्ये ‘ज्ञान प्रबोधिनी’ ही संस्था शाळेच्या इमारतीत सुरू केली. पुणे या विद्येचे माहेरघरामधील या ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या संस्थेचा पाया ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ ही शाळा आहे.
८] शाळा : नवीन मराठी शाळा, पुणे.
१८९९ मध्ये भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या नेतृत्वामध्ये शाळेतील वरील वर्गातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे इ. १ ली ते ४ थी चे वर्ग सुरू करण्यात आले.
९] शाळा : अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल, पुणे.
१९३१ साली इतिहासप्रसिद्ध होळकर वाडा इंदूर सरकारकडून सोसायटीस मिळाला. विद्यार्थिनींच्या वाढत्या संख्येमुळे मुलींसाठीचे वर्ग स्वतंत्र करण्यात आले. ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेने गद्रे वाडा व होळकर वाडा या दोन वाड्यांचे एकत्रीकरण करून १९४४ पासून अहिल्यादेवी हायस्कूल सुरू केले.
१०] शाळा : न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे.
न्यू इंग्लिश स्कूल, नाना वाडा, पुणे या शाळेमध्ये येणाऱ्या वाढत्या संख्येमुळे रमणबाग येथील जागा घेऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेने तिथे इमारत बांधली होती. १९१३ पासून शाळेचा हा भाग न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग या नावाने ओळखला जात असे. नाना वाडा येथूनच रमणबागचा कारभार पाहिला जात असे. १९४६ मध्ये नाना वाड्यातील शाळेची मुख्य शाखा सध्याच्या टिळक रोड येथे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे प्रशासकीय सोयीसाठी रमणबागचे वर्ग स्वतंत्र करण्यात आले.
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणेआवारातील शाळा
न्यू इंग्लिश स्कूल, पुणे ही शाळा १९५४ पासून पुणे शहरातील टिळक रोड येथे भरते. या शाळेच्या आवारामध्ये १९८५ पासून डी. ई . एस. स्कूल (प्री प्रायमरी, प्रायमरी), व माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे (पूर्वप्राथमिक, प्राथमिक), १९९१ पासून डी. ई . एस. सेकेंडरी स्कूल, २००८ पासून माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे (माध्यमिक), २०१० पासून डि. ई . एस. न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, पुणे, २०१६ पासून डी. ई. एस. प्री प्रायमरी मुरलीधर लोहिया मातृमंदिर, पुणे व १९२२ पासून डी. ई. एस. प्री प्रायमरी मुरलीधर लोहिया मातृमंदिर (डे केअर सेंटर), पुणे या शाळांची सुरूवात झालेली आहे.
निष्कर्ष : न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे ही शाळा १८८० रोजी स्थापन झाली. या शाळेचा आदर्श घेऊन, संस्थापकांचा आदर्श घेऊन, मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत: शाळेकडून प्रेरणा घेऊन समाजातील अनेकांनी स्वत: शाळा, संस्था, महाविद्यालये व विद्यापीठे निर्माण केलेली आहेत. या सर्व शाळा, संस्था, महाविद्यालये व विद्यापीठे यांनी पुणे शहराची ‘विद्येचे माहेरघर’ अशी सामाजिक ओळख होण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे आणि या शाळा व संस्थांचा पाया ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ ही शाळा असल्याने न्यू इंग्लिश स्कूल, पुणे ही शाळा विद्येच्या माहेरघराचा पाया आहे, असा निष्कर्ष काढता येतो.
संदर्भ :
1. Mecaulay's Minutes on Education, February 2, 1935, Page no. 8.
2. शिरगुरकर वि. रा., नूतन मराठी विद्यालय शतकपूर्ती स्मारकग्रंथ : १९८३, प्रकाशक: ग. वा. दीक्षित, पृष्ठ क्र. १, २ व ५.
3. यशवंत दिनकर फडके, शोध बाळ-गोपाळांचा, श्रीविद्या प्रकाशन पुणे, आवृत्ती १९७७, पृष्ठ क्र. १२८.
4. अक्षीकर श्री. के., अनासक्त कर्मयोगी, रोहन प्रकाशन पुणे, आवृत्ती २०१३, पृष्ठ क्र. २३, ३०.
5. तेरणीकर सुलभा, गाथा शतकाची, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, २००८, पृष्ठ क्र. २५.
6. पटवर्धन नारायण महादेव, धोंडो केशव कर्वे आत्मवृत्त व चरित्र, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पृष्ठ क्र. ४५२.
7. कै. प्रा. शं. रा. कानिटकर स्मृतिग्रंथ, पुनर्मुद्रण २०१४, पृष्ठ क्र. ८.
8. Deccan Education Society Pune report, Page no.
9. Limaye P.M., THE HISTORY OF THE DECCAN EDUCATION SOCIETY (Part 2), Page no. 53, 54.
10. न्यू इंग्लिश स्कूल शताब्दी विशेषांक, पृष्ठ क्र. ५, ४६, ४७.
11. न्यू इंग्लिश स्कूल शताब्दी विशेषांक, पृष्ठ क्र. ५, ३७.
12. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे नियतकालिक आपली शाळा २०२२-२३, पृष्ठ क्र. ७१, ७२.