आमच्याबद्दल
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे मध्ये आपले सहर्ष स्वागत
‘राष्ट्रीय शिक्षण देणारी भारत देशातील ही पहिली शाळा आहे’. भारतीय राष्ट्रवादाचे जनक व मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सुधारक गोपाळ गणेश आगरकर व उद्योगधोरणी माधवराव उर्फ महादेव बल्लाळ नामजोशी यांनी गुरुवार, दिनांक १ जानेवारी १८८० रोजी राष्ट्रीय शिक्षण देणारी देशातील पहिली शाळा ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ स्थापन झाली. शाळेच्या संस्थापकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार करवीरचे चौथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीसाठी तुरूंगवास भोगला. याचे स्मरण ठेवत करवीर नगरीचे नवीन सिंहासनाधीश्वर राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे’ संस्थेचे अध्यक्ष झाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आजीवन संस्थेचे अध्यक्ष राहिले.
‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ या शाळेने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देशाला अनेक नररत्ने दिली. शाळेच्या स्थापनेच्या काळातच प्रसिद्ध इतिहासकार व नाटककार वासुदेवशास्त्री खरे, सरकारी शाळेतील नोकरी सोडून आलेले संस्कृत पंडित गोपाळ रघुनाथ नांदर्गीकरशास्त्री, ‘श्रीशिवाजी छापखान्याचे व वर्तमानपत्राचे मालक श्री. मांडे असे नामांकित शिक्षक शाळेस लाभले.
‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ शाळेच्या शिक्षकांमध्ये मराठी व्याकरणकार रामभाऊ जोशी, इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे (माजी विद्यार्थी), महाराष्ट्राचे शेक्सपिअर उर्फ गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी (माजी विद्यार्थी) असे नामवंत शिक्षक होते.
‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ शाळेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांमध्ये भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतीय राष्ट्रीय नेतृत्व झालेले मवाळ गटाचे प्रमुख नेते तसेच महात्मा गांधींचे राजकीय गुरू नामदार गोपाळ कृष्ण गोखले, संस्कृत व्याकरणकार वामन शिवराम आपटे, मराठी व्याकरणकार व कर्ते समाजसुधारक रामभाऊ जोशी, मराठीचे पाणिनी म्हणून प्रसिद्ध असलेले मो. रा. वाळंबे, सिंध प्रांतातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून आलेले वैजनाथ काशिनाथ राजवाडे, पुण्यातील नामवंत अभ्यासक प्रा. विश्वनाथ बळवंत नाईक, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेचे संस्थापक शंकरराव कानिटकर, भारत व अमेरिका यांच्या शिक्षणपद्धतीचे अभ्यासक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. द. न. गोखले हे होते.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आरंभीच्या काळातील आजीव सदस्य वासुदेव बाळकृष्ण केळकर, महादेव शिवराम गोळे व नारायण कृष्ण धारप हे ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ शाळेमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक होते.
‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ शाळेमध्ये आधुनिक मराठी कादंबरीचे जनक हरि नारायण आपटे, ‘काळ’कर्ते शिवरामपंत परांजपे, बाबासाहेब पोतदार, आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले, प्रसिद्ध लेखक नरहर रघुनाथ फाटक, सेनापती उर्फ पांडुरंग सदाशिव बापट, मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री/ पंतप्रधान बाळ गंगाधर खेर, देशपातळीवरील समाजवादी नेतृत्व एस. एम. जोशी उर्फ श्रीधर महादेव जोशी, समाजवादी नेते नानासाहेब गोरे उर्फ नारायण गणेश गोरे, समाजवादी नेते र. के. खाडिलकर, हिंदू महासभेचे अध्यक्ष लक्ष्मण बळवंत भोपटकर, १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनामध्ये पुण्यामधून पहिल्यांदा शहीद होणारे नारायण दाभाडे असे विद्यार्थी घडले.
‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून आलेले आणि शिक्षणानंतर शिक्षक व मुख्याध्यापक ही पदे भूषवणारी दोन व्यक्तिमत्वे आहेत. प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देणारे हरि गोविंद लिमये व इंग्रजी व्याकरणकार पु. ना. वीरकर या अशा ऐतिहासिक दोन व्यक्ती आहेत.
‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ शाळेशी संबंधित घटकांची प्रेरणा घेऊन नूतन मराठी विद्यालय, पुणे ही शाळा आणि भावी काळात याच शाळेमधून उभी राहिलेली शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे ही संस्था, दादर इंग्लिश स्कूल, मुंबई ही शाळा आणि भावी काळात याच शाळेमधून उभी राहिलेली जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, मुंबई ही संस्था, महिला विद्यालय, हिंगणे, पुणे ही शाळा आणि याच शाळेमधून उभी राहिलेली महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे ही संस्था, मॉडर्न विद्यालय, पुणे ही शाळा आणि याच शाळेमधून उभी राहिलेली प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन इन्स्टिट्यूट, पुणे ही संस्था या संस्था स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उभ्या राहिल्या आहेत.
‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ शाळेमधून निर्माण झालेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे विद्यापीठ निर्माण झाले. शाळेचे संस्थापक लोकमान्य टिळक यांच्या नावावर आधारित टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले. शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी देशातील पहिले महिला विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी उर्फ एस.एन.डी.टी. विद्यापीठ अशी विद्यापीठे निर्माण झाली आहेत.
ज्या शाळेतील व्यक्तीमत्वांच्या उल्लेखाशिवाय भारत देशाची स्वातंत्र्यचळवळ, शैक्षणिक चळवळ, गोवामुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, समाजसुधारणा चळवळ, समाजवादी चळवळ, क्रांतिकारी चळवळ, पूर्ण होऊ शकत नाही, अशी न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे ही शाळा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (१५०) वर्षाकडे वाटचाल करत आहे.
उद्दिष्ट
राष्ट्रीय शिक्षणापासून राष्ट्रनिर्मितीचे व्यावसायिक व व्यावहारिक शिक्षण
विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम ठेवणे.
प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभिमान असणारे विद्यार्थी घडवणे.
आधुनिक काळामध्ये सक्षमपणे जीवन जगण्यासाठी आवश्यक पायाभूत तयारी करून घेणे.
विद्यार्थ्यांना पाठांतरापेक्षा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी व कृतियुक्त शिक्षण देणे.
विद्यार्थ्यांना स्वत:च्या हक्कांसह नैतिक जबाबदारीची जाणीव करून देणारे शिक्षण देणे.
प्रत्यक्ष अनुभवाद्वारे विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन सक्षम उद्योजक घडवणे.
ध्येय
1. DECISION (By Government, Society) ,
निर्णय (शासन व संस्थेकडून घेतले जातात.)
2. DEDICATION (From Society and School authority),
समर्पण ( शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयांसाठी संस्थेचे आणि संस्थेकडून घेण्यात आलेल्या निर्णयांच्या पूर्ततेसाठी शाळेचे समर्पण)
3. DEVOTION (Teachers)
एकनिष्ठपणे कार्य (शासन व संस्थेस अपेक्षित असलेल्या आदर्शवत भावी नागरिकांना घडवण्यासाठी शाळेतील शिक्षक एकनिष्ठपणे कार्य करतात)
4. DEVELOPMENT (Students)
व्यावसायिक कौशल्य प्राप्त असलेले जागतिक दर्जाचे भारतीय नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण व सर्वांगीण वाढ, सुधार व प्रगती साधण्यासाठी ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य विकास साधून संश्लेषण, विश्लेषण व सर्जनशील मनोवृत्ती विकसित केली जाते.
आम्ही सर्वोत्तम का आहोत?
उत्कृष्ट शैक्षणिक घटक
शाळेतील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आव्हानात्मक बनवण्यासाठी , त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांना प्राप्त करण्याकरिता आणि त्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे.
अनुभवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
शाळेतील प्रत्येक घटक उत्साही, तंत्रस्नेही, उच्चविद्याविभूषित असून प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहेत.
अत्याधुनिक सुविधा
शाळेचा आधुनिक परिसर शिक्षणासाठी पोषक असून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी परिपूर्ण वातावरण मिळण्यास त्यामुळे मदत होते.