श्रीमती सुनीता राव
मुख्याध्यपिका
‘न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे’ ही राष्ट्रीय शिक्षण देणारी भारत देशातील पहिली शाळा आहे. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक, सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर व उद्योगधोरणी महादेव बल्लाळ नामजोशी यांनी भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणारी आणि नवीन काळातील आव्हानांस ठामपणे सामोरे जाणाऱ्या भारतीय नागरिकांना घडवण्यासाठी १ जानेवारी १८८० रोजी या शाळेची स्थापना केली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळामध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे’ या शाळेने दिलेले योगदान इतके महत्वाचे आहे की या शाळेतील संस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांशिवाय भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. राष्ट्रीय शिक्षणापासून सुरू झालेला शाळेचा प्रवास १५ ऑगस्ट १९४७ रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यापर्यंत पोहचला.
स्वतंत्र भारत देशामध्ये समर्थ व सक्षम भारतीय नागरिकांना घडवण्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने आधुनिक युगाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण व्यावसायिक व व्यावहारिक कौशल्य प्रदान करण्याचे आव्हान शाळेने लीलया पेललेले आहे. शालेय अभ्यासक्रमाच्या अध्यापनासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मनोरंजनात्मक अध्ययनासाठी प्रत्येक वर्गामध्ये मोठ्या आकाराचा दूरचित्रवाणी संच उपलब्ध आहे. शाळेस भव्य मैदान लाभलेले असून विविध खेळांचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक शाळेमध्ये उपलब्ध आहेत. शाळेमध्ये इंग्रजी भाषा प्रयोगशाळा, गणित खेळघर, आभासी वर्ग, तारांगण, वेधशाळा असे वैशिष्ट्यपूर्ण वर्ग शाळेमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय आधुनिक संगणकीय ज्ञान देणारे आय.सी.टी. कोर्स, सुतारकाम, प्लंबिंग, बागकाम, अन्नप्रक्रिया, मूर्तीकला अशी कौशल्येही विद्यार्थ्यांस शिकवली जातात. कला व क्रीडा क्षेत्रांमध्ये सहभागी होऊन स्वत:स सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांना निरंतर नवनवीन संधी प्राप्त करून देण्यासाठी शाळा कटिबद्ध असते.