महाराजा सयाजीराव गायकवाड आणि न्यू इंग्लिश स्कूल, पुणे
Posted on April 4, 2025
श्री. योगेश पाटील
शिक्षकप्रास्ताविक :
भारतीय पारतंत्र्याच्या काळामध्ये भारत देशामध्ये शेकडो संस्थाने म्हणजेच राज्ये होती. या संस्थानांचे स्वतंत्र राजे होते. यातील बहुतांशी राजे ऐश-आराम करण्यात जीवन व्यतीत करत होते. या काळामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी रयतेचे राजे म्हणून कार्य केले अशा काही निवडक राजांमध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड हे नाव प्राधान्याने घ्यावे लागते. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्म दिनांक, ११ मार्च १८६३ रोजी झाला. एका सामान्य घरामध्ये जन्मास आलेल्या बारा वर्षांच्या गोपाळ काशीराव गायकवाड यांनी बडोद्याच्या राजमाता जमनाबाईसाहेब यांसमोर ‘मी बडोद्याचा राजा होण्यासाठी इथे आलो आहे!’ असे उत्तर दिले आणि राजमाता भारावून गेल्या. त्यांनी२०मे १८७५ रोजी गोपाळला दत्तक घेतले आणि लहानगा गोपाळ आता सयाजीराव म्हणून ओळखला जाऊ लागला. १८७५ ते १८८१ या काळामध्ये सयाजीराव लहान असल्याने ‘वयानेअज्ञानीराजे’ म्हणून ओळखले जात होते. अखेर२८ डिसेंबर १८८१ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला. १८८१ ते १९३९ या काळामध्ये सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानाचा राज्यकारभार केला.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी राज्यकारभाराची सूत्रे सांभाळली त्याच काळामध्ये दिनांक १ जानेवारी १८८० पासून मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर व उद्योगधोरणी महादेव बल्लाळ नामजोशी यांनी ‘राष्ट्रीय शिक्षण’ देणारी देशातील पहिली शाळा ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ स्थापन केली.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा समाजसंपर्क व सामाजिक कार्य पाहता न्यू इंग्लिश स्कूल, पुणे ही नावाजलेली शाळा, शाळेचे संस्थापक मुखाध्यापक व शिक्षक यांसोबत संबंध येणे अपरिहार्य होते.
सूचनक शब्द : केसरी, मराठा, न्यू इंग्लिश स्कूल पुणे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वामन शिवराम आपटे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळ कृष्ण गोखले.
केसरी व मराठा मधील लेख:
न्यू इंग्लिश स्कूलच्या संस्थापकांनी लोकशिक्षणासाठी दिनांक २ जानेवारी १८८१ रोजी ‘केसरी’ हे मराठी साप्ताहिक वर्तमानपत्र आणि दिनांक ४ जानेवारी १८८१ रोजी ‘मराठा’ हे इंग्रजी साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले. याच काळामध्ये बडोद्याचे महाराज मल्हारराव गायकवाड हे पदच्युत केले गेले होते. त्यांचे दत्तकपुत्र सयाजीराव यांच्या हाती कारभार अजून देण्यात आला नव्हता. त्यामुळे सर्व कारभार दिवाण राजा सर टी. माधवराव यांच्या हाती होता. त्यांच्यावर इंग्रजांचे नियंत्रण होते. हे दिवाण इंग्रज सरकारच्या दृष्टीने योग्य असणारे काम करत असल्याचा संशय त्याकाळी समाजास येत होता. केसरी व मराठामध्ये याबाबत वर्षभर टीका केली गेली मात्र ही टीका विकोपास गेली नाही. पुढील वर्षी केसरी व मराठाने कोल्हापूर संस्थानाबाबत लेखन केले आणि त्याबद्दल संपादक टिळक व आगरकर यांनी तुरूंगवासही भोगला.
वरील घटनेबाबत केसरी व मराठा वर्तमानपत्रांवर टीकेची झोड उठवणाऱ्या पत्रांना उद्देशून एक पत्र लिहिले गेले. दिनांक १३ सप्टेंबर १८८१ रोजी ‘पत्रे पाठवणाऱ्यास सूचना’ या मथळ्याखाली केसरीमध्ये हा इशारा देण्यात आला. ‘बडोद्यासंबंधाने आम्ही चर्चा करितो म्हणून काही लोक मोठी तर्हेवाईक पत्रे आमच्याकडे धाडीत असतात. असे करणाऱ्यांचा मतलब काही असो. पण सर्व बातमीदारांनी इतके लक्षात ठेवावे की खात्रीलायक सह्या देऊन ते लिहितात तो मजकूर खरा आणि साधार अशी आमच्या दिलाची खात्री झाल्याखेरीज आम्ही कोणचेही पत्र छापणार नाही. टवाळ लोकांच्या हुच्चेपनाच्या लेखास केराच्या करंडीतच स्थान मिळावयाचे’
एक सामान्य गुराखी मुलगा बडोद्याच्या गादीवर विराजमान होत आहे, हे पाहताना न्यू इंग्लिश स्कूलच्या संस्थापकांना आनंद होत होता आणि त्यामध्ये कोणताहीअडसर येऊ नये, यासाठीप्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केले होते.
न्यू इंग्लिश स्कूल, पुणेशाळेस भेट
सप्टेंबर १८८५ मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी न्यू इंग्लिश स्कूल, पुणे शाळेस भेट दिली. गद्रे वाडा, पुणे येथे भरणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भाषण केले. माधवराव रानडे यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे आभार मानले.
बडोद्याच्या गादीवर बसल्यानंतर आपल्यासाठी आवाज उठवणाऱ्या शाळेच्या संस्थापकांची भेट घेण्याची इच्छा सयाजीरावांच्या मनामध्ये असेल म्हणूनच महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी पुणे दौऱ्यामध्ये शाळेस भेट देण्यासाठी वेळ काढला, हीघटनामहाराजांच्या मोठ्या मनाचे द्योतक आहे.
न्यू इंग्लिश स्कूल, पुणे शाळेस देणगी
१८८० मध्ये स्थापन झालेल्या न्यू इंग्लिश स्कूल, पुणे शाळेची दिवसेंदिवस भरभराट होत होती. १८८४ मध्ये शाळेच्या संस्थापकांनी काही मान्यवरांच्या उपस्थितीत ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. या संस्थेस महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी १८८९ मध्ये रू. १२,०००/- इतकी मोठी देणगी प्रदान केली. सदर देणगी शाळेच्या व संस्थेच्या विकासासाठी सहाय्यक ठरली.
१८८९ च्या सुमारास सोने सरासरी रू. १८ /- प्रति १० ग्रॅम होते. २०२४ मध्ये हेच सोने सरासरीरू. ६५,००० /- प्रतिग्रॅम आहे. या हिशोबाने विचार करता आज ही किंमत रू. ४,३३,३३,३३३ /- इतकीप्रचंड आहे. दुसऱ्या बाजूने विचार करता एवढ्या मोठ्या रकमेचे काय झाले, हेसयाजीरावांनी विचारल्याचे पत्र अस्तित्वात नाही. म्हणजेच शाळेच्या व संस्थेच्या संचालकांवर सयाजीरावांचा दृढ विश्वास होता, असेस्पष्ट होते.
महाराजांच्या मताबाबत टिळक-आगरकरांची भूमिका
मे १८९३ मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी, ‘जातीभेद नाहीसा झाल्याशिवाय देशाची उन्नती होणार नाही आणि शिकलेल्या लोकांना जातीभेद मोडण्याचे धैर्य होत नाही’ याबद्दल खंत व्यक्त केली.
न्यू इंग्लिश स्कूलचे दोन संस्थापक याबाबत एकमेकांच्या विरोधी मत व्यक्त करत होते. १६ मे १८९३ रोजी लोकमान्य टिळकांनी महाराजांच्या या मतावर टीका करणारा लेख ‘केसरी’मध्ये लिहिला. त्यांच्या मते, ‘देशोन्नतीसाठी सर्व जाती-धर्मांच्या लोकांचे रोटी-बेटी व्यवहार सुरू करणे आचरटपणाचे ठरेल.
न्यू इंग्लिश स्कूलचे दुसरे संस्थापक गोपाळ गणेश आगरकर मात्र याबाबत महाराजा सयाजीराव गायकवाड यांना पाठींबा देतात. २२ मे १८९३ रोजी ‘निष्पक्षपात’ या टोपणनावाने ते लिहितात, ‘सारखी योग्यता होण्यासाठी रोटीव्यवहार झाला पाहिजे इतकेच नाही तर बेटीव्यवहारही झाला पाहिजे आणि हा रोटी-बेटीव्यवहार होण्यास जातीभेद नाहीसा झाला पाहिजे.
१८८१ मध्ये सयाजीराव गायकवाड यांच्या बाजूने केसरी व मराठामध्ये लेखन करणाऱ्या लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांची १८९३ मध्ये त्याच महाराजांच्या भूमिकेबाबत वेगवेगळी मते दिसून येतात. आगरकरांनी महाराजांच्या मतास पाठींबा दिलेला आहे त्यामुळे त्याबाबत अधिक विश्लेषणाची गरज नाही मात्र लोकमान्य टिळकांच्या मताचा विचार करता हे स्पष्ट करावे लागेल की, ‘लोकमान्य टिळकांचा सामाजिक सुधारणांना विरोध नव्हता. लोकांना विश्वासात घेऊन सामाजिक सुधारणा कराव्यात’अशी टिळकांची भूमिका होती, हेअनेक ऐतिहासिक उदाहरणावरून स्पष्टहोते. प्रस्तुतशोधनिबंधामध्ये टिळकांची भूमिका मांडण्याचा उद्देश नसल्याने त्याबाबत अधिक लिहित नाही.
नामदार गोपाळ कृष्ण गोखले
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक राहिलेले प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे पुरोगामी विचारांचे मवाळ गटाचे भारत देशातील प्रमुख नेते होते. महाराजा सयाजीराव गायकवाड हे ही पुरोगामी व सुधारक होते. त्यामुळे त्यांचा संपर्क येणे अपरिहार्य होते. १९१४ साली महाराजा सयाजीराव गायकवाड यांसोबत नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झलॅड या देशांचा एकत्रित दौरा केलेला दिसून येतो पहिल्या महायुद्धाचे ढग अधिक गडद झाल्याने त्यांनी हे दौरे उरकले आणि भारतात परतले. यानंतर एक वर्षात दिनांक १९ फेब्रुवारी १९१५ रोजी नामदार गोखले यांचे निधन झाले.
महाराज व गोखले हे पुरोगामी होते. देशातील कर्तृत्ववान नेते होते. अर्थशास्त्राची जाण असणारे समाजसुधारक होते. त्यामुळे या त्यांच्या एकत्रित दौऱ्यास विशेष महत्व आहे परंतु यानंतर नामदार गोखले यांच्या अल्पकाळात झालेल्या निधनामुळे या जोडीच्या माध्यमातून होऊ शकणारी काही महत्वाची कामे होऊ शकली नाहीत, असेम्हणता येईल.
अस्पृश्यता निवारण परिषद
मार्च १९१८ मध्ये मुंबई येथे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘अस्पृश्यता निवारण परिषद’ घेण्याचे निश्चित केले. अखिल भारतीय स्तरावर एक जाहीरनामा काढून त्यावर देशातील सर्व जातींच्या पुढाऱ्यांच्या सह्या घ्याव्यात, असे महर्षी शिंदे यांना वाटत होते. न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक लोकमान्य टिळक या काळामध्ये इंग्लंडमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये होते मात्र महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आग्रहास्तव त्यांनी अस्पृश्यता निवारण सभेस येण्यासाठी तयारी दर्शवली.
२४ मार्च १९१८ रोजी ही परिषद झाली. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळक यांनी भाषण केले, ’देव सर्वांचा आहे. देवाच्या नजरेत मंगल-अमंगल भेदाला स्थान नाही, तर मग आपण ते का द्यावे ? देवाला स्वत:ला कोणी अस्पृश्य वाटत नसता एखाद्याला अस्पृश्य म्हणणे हे पाप होय. देव जर अस्पृश्यता पाळू लागला तर मी त्याला देव म्हणणार नाही. अस्पृश्य यापुढे अस्पृश्य मानले जाऊ नयेत, असे माझे मत आहे. हा फक्त सामाजिक रुढीचा मामला आहे आणि ही सामाजिक रूढी बदलली पाहिजे. कुठल्यातरी जुन्या काळात ब्राह्मणांच्या अधिकारशाहीने ही रूढी निर्माण केली, हे मी नाकारत नाही. तो एक कलंक आहे आणि तो दूर केलाच पाहिजे. याबाबत मी व्यक्तिश: काय करतो असे पुष्कळजण विचारतात. तेमाझे काम नाही असे माझे उत्तर आहे.मी अनेक कामे हाती घेऊ शकत नाही. अनेकविध चळवळींचे नेतृत्व करण्याएवढा माझा मेंदू सक्षम नाही. अशा चळवळी व उपक्रमांना माझी पूर्ण सहानुभूती आहे’.
महर्षी शिंदे यांनी एक पत्रक तयार केले होते. ज्या पत्रकामध्ये ‘दैनंदिन जीवनात आपण अस्पृश्यता पाळणार नाही’ असेलिहिलेले होते तेटिळकांसमोर ठेवण्यात आले. टिळकांनी त्यावर सही केली नाही.भाषणामध्ये अस्पृश्यता नाकारणाऱ्या परमेश्वरास नाकारणारे टिळक त्याच परिषदेमध्ये त्याच विचारांच्या लिखित कागदावर सही करण्यास तयार नव्हते. निमंत्रक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना लोकमान्य टिळकांनी आधीच सांगितले होते की, ‘मी एक व्यक्ती म्हणून या परिषदेस हजर राहील’.
लोकमान्य टिळक यांचेस्वत:चे विचार जरी प्रागतिक असले तरीही त्यांना समाजसुधारक न होता राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी लोकमान्य म्हणूनस्वत:चे कार्य पुढे न्यायचे होते. या काळामध्ये राष्ट्रीय चळवळींचे नेतृत्व मोठ्या प्रमाणात सवर्ण समाजाकडे होते. तत्कालीन सवर्ण समाजास सहज मान्य होणार नाही, अशी भूमिका घेण्याची टिळकांची तयारी नव्हती. त्यामुळे स्वत: व्यक्ती म्हणून अस्पृश्यता चुकीची वाटत असली तरीही टिळकांनीसार्वजनिकरित्या अशा कागदावर सही करण्यास नकार दिला.
महाराजांचासत्कार व न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड,पुणे
इ.स. १९३३साली सयाजीराव गायकवाड यांच्या वयाच्या एक्काहत्तरीनिमित्त पुण्यामध्ये त्यांचा अनेकठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पूर्वी शिक्षक व मुख्याध्यापक राहिलेल्याअनेकव्यक्तींनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सयाजीरावांचा सत्कार केला आहे. यामध्येन्यू इंग्लिश स्कूल, पुणे शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक असलेले प्रि. वै. का. राजवाडे यांनी डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी,शाळेचे माजी शिक्षक व मुख्याध्यापक असलेले प्रो. वि. ब. नाईकयांनी वेदशास्त्रोत्तेजक सभा, शाळेचे माजी विद्यार्थी रा. ल. ब. भोपटकर यांनी अस्पृश्यता निवारक मंडळ, शाळेचे माजी विद्यार्थी प्रो. मा.धो. कर्वेयांनीअनाथ बालिकाश्रम, शाळेचे माजी शिक्षक व मुख्याध्यापक, प्रो.धोंडो केशव कर्वे यांनीश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातर्फे तसेच शाळेमधून निर्माण झालेली संस्था ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’तर्फेप्रि. ग. स. महाजनीयांनी सयाजीराव गायकवाड यांचा सत्कार केला आहे.
न्यू इंग्लिश स्कूलचाहीरक महोत्सव
दिनांक१ जानेवारी १९४० रोजी न्यू इंग्लिश स्कूल,पुणे शाळेस साठ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल शाळेमध्ये हीरक महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार होते मात्र त्यापूर्वीच दिनांक ६ फेब्रुवारी१९३९ रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे निधन झालेले होते. न्यू इंग्लिश स्कूल, पुणे शाळेने सयाजीराव यांसोबतच्या आठवणींचीव सहकार्याची जाणीव ठेवली. बडोद्याचे राजकुमार धैर्यशीलराव गायकवाड यांना सदर कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. धैर्यशीलराव आजारी असल्यामुळे त्यांना कार्यक्रमास येता येणार नाही, असेत्यांचेसचिव श्री.ठोंबरे यांनी पत्राने कळवले.
निष्कर्ष :
न्यू इंग्लिश स्कूल, पुणेही शाळा व महाराजासयाजीरावगायकवाड यांच्या कारकीर्दीची सुरूवातसाधारणपणे एकाच काळामध्ये झाली. शाळेच्यासंस्थापकांनी निर्माण केलेल्या ‘केसरी’ व‘मराठा’ या वृत्तपत्रांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांसाठी आरंभीच्या काळामध्ये लेखन केले आणि सयाजीराव यांनी राज्याभिषेकानंतरच्या काळामध्ये शाळेसोबत चांगले संबंध ठेवले. कधी शाळेस भेट दिली तर कधी देणगी दिली.सयाजीराव गायकवाड यांच्याविचारांस गोपाळ गणेश आगरकर यांनी पाठींबा दिला. नामदार गोखले यांनी त्यांसोबत जागतिक प्रवास केला. शाळेमध्येहीगरजवंत मागासवर्गीयांसाठी १९१८ साली मोफत शिक्षणाची व्यवस्था होती.
न्यू इंग्लिश स्कूल, पुणेशाळेचे संस्थापक लोकमान्य टिळकांचे अस्पृश्यतेबाबत असणारेमौलिक विचार त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यासमोर मांडले. राजकीय भूमिका वेगळी असल्यामुळे टिळकांना पत्रकावर सही करता आलीनाही तरीही टिळकांचे विचार प्रागतिक होते, सयाजीरावांच्या विचारांशी जुळणारे होते, हे स्पष्ट होते.महाराजा सयाजीराव यांच्या एक्काहत्तराव्या वाढदिवसानिमित्त झालेल्या पुणे दौऱ्यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी पुण्यातील विविध संस्थांच्या माध्यमातून तसेच शाळेतून निर्माण झालेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीसंस्थेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.अशाप्रकारे न्यू इंग्लिश स्कूल, पुणे शाळा व महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे ऐतिहासिक एकमेकांस पूरक संबंध होते, हे सिद्ध होते.
संदर्भ :
- न्यू इंग्लिश स्कूल शताब्दी विशेषांक, १८८०, पृष्ठ क्र. ९.
- न. चि. केळकर, लोकमान्यटिळकयांचेचरित्र, प्रकाशक : केळकर, आवृत्ती१९२३, पृष्ठक्र. १२७, १२९.
- फाटक, न. र., न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे चरित्र, नीलकंठ प्रकाशन, दुसरी आवृत्ती १९६६, पृष्ठ क्र. २५०.
- Limaye P.M., The History of The Deccan Education Society (Part 2), 1935, Appendices Page no. 67.
- फडके य. दि., आगरकर, मौज प्रकाशन पुणे, तिसरी आवृत्ती पुनर्मुद्रण डिसेंबर २०१९, पृष्ठ क्र. २१३.
- फाटक न. र., आदर्श भारतसेवक, मौज प्रकाशन पुणे, पहिली आवृत्ती १९६७, पृष्ठ क्र. २०७.
- प्रधानग. प्र., लोकमान्य टिळक, नशनल बुक ट्रस्ट इंडिया, नववे पुनर्मुद्रण २०१८, पृष्ठ क्र. ९८.
- कीर धनंजय, लोकमान्य टिळक, पॉप्युलर प्रकाशन मुंबई, आवृत्ती २०२०, पृष्ठ क्र. ४२८.
- पाटील रा. शा., श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांचा महाराष्ट्रातील सत्कार, सरकारी छापखाना बडोदे, आवृत्ती १९३३, पृष्ठ क्र. ५५ ते ५७.
- An Account of Diamond Jubilee Celebration Of The New English School, Poona, Edition 1940, Page no. 16.
- मी एस.एम., एस.इसम. जोशी,कॉनटीनेंटल प्रकाशन, आवृत्ती२०१३, पृष्ठ क्र. १५, १६.