प्रवेश सुरु

मी मंगेश कुडले  न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड या शाळेचा माजी विद्यार्थी ....त्यामुळे या शाळेविषयी मनामधे एक हळवा कोपरा ! आणि कदाचित त्यामुळेच की क़ाय, हा ऋणानुबंध,  हा वारसा पुढच्या पिढीकड़े सोपवावा,  माझ्या मुलीलाही याच शाळेत प्रवेश घ्यावा,  अशी इच्छा होत होती. बहुतांश जणांच्या मनात त्यांची शाळा जिवंत असतेच पण आपल्या मुलामुलींना तिथे प्रवेश घेताना अनेक जण बिचकतात! त्यावेळची शाळा,  शिक्षक,  मित्र भारी होते,  आता परिस्थिती वेगळी आहे इ. पळवाटा शोधल्या जातात. माझ्याही मनात तशी तुलना सुरू झाली (आणि माझे वरचेवर शाळेत येणे-जाणे असल्याने तशी वस्तुनिष्ठ तुलना करणे मला थोडे सोपेही गेले). जसजसा विचार करत गेलो तसतशी माझी शाळा प्रत्येक बाबीत उत्तम श्रेणीने पास होत गेली, आणि माझा निर्णय पक्का होत गेला.
 
 पहिला विचार आला तो म्हणजे शाळेच्या इमारतीला *शाळेचे व्यक्तिमत्व* हवे, एखाद्या चौकोनी ठोकळेबाज क्लाससदृश इमारतीत ही तथकथित शाळा नसावी,  विस्तीर्ण परिसर, *दुर्मिळ Y आकाराची इमारत*, त्यामुळे हवेशीर व भरपूर प्रकाशयुक्त वर्ग यांनी परिपूर्ण शाळा त्या कसोटीवर विशेष गुणवत्ता श्रेणीने उत्तीर्ण झाली.

दूसरी कसोटी होती की त्या शाळेला भरपूर *मोकळे मैदान* असावे जे मुक्त वापरासाठी,  खेळण्यासाठी उपलब्ध असावे. या शाळेला कदाचित पुण्यातील सर्व शाळांमध्ये सर्वात मोठे मातीचे मैदान आहे , ते कमी म्हणून की क़ाय एक फरशीचे मैदानही आहे. शिवाय इतरत्र जी काही मोकळी जागा, परिसर आहे तोही मैदानापेक्षा कमी नाही. त्यात दुधात साखर म्हणजे या मैदानांचा पुरेपुर वापर व्हावा म्हणून शाळेकडून क्रिकेट , खोखो , कबड्डी , कराटे इ. अनेक खेळ चे प्रशिक्षणही दिले जाते. पण या भौतिक गोष्टींपेक्षा सर्वात महत्वाची असणारी गोष्ट म्हणजे शाळेचा आत्मा असणारे शिक्षक , शिक्षिका ...
ही कसोटी मात्र जास्त काटेकोर लावणे गरजेचे होते .

माझ्यासाठी शिक्षक किती हुशार, विद्वान, पदवीधारक आहे यापेक्षा तो मुलामुलींना किती त्यांच्या पातळीवर उतरून शिकवू शकतो,  त्यांच्या भावविश्वात प्रवेश करू शकतो,  त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर त्याच्या वागण्याबोलण्यावर, व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकू शकतो हे महत्वाचे होते. इथले अनेक शिक्षक विविध विषयात डॉक्टरेट मिळवलेले आहेत. उत्साही, उपक्रमशील आहेत. प्रत्येक मुलाला नावाने व पार्श्वभूमीनेही ओळखणारे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे -  त्यांनी ही गोष्ट केवळ 8 तासांची नोकरी म्हणून न पत्करता पेशा म्हणून स्विकारली आहे.
 
अजून एक गोष्ट मला महत्वाची होती, ती म्हणजे अभ्यास एके अभ्यास करून फक्त शैक्षणिक प्रगती काळी जात नाही तर त्याचबरोबर कला,  खेळ,  कौशल्ये इ. कड़ेही लक्ष दिले जाते.  या शाळेत अनेक उपक्रमांच्याद्वारे हा प्रयत्न सतत होत असल्याची कल्पना मला होती. ( मुलीच्या भविष्याचा प्रश्न असल्याने भावना बाजूला ठेवून ) या मुख्य आणि इतर अनेक छोट्यामोठ्या बाबींचा परखडपणे विचार करून माझ्या मुलीला या माझ्या शाळेत प्रवेश घेतला. आणि तो विश्वास सार्थ ठरून गेल्या वर्षी ती या शाळेतून अनेक बाबींची शिदोरी घेऊन बाहेर पडली आहे ....
 
 अशीच शिदोरी अनेकानेक मुलामुलींना मिळत रहावी, हीच प्रार्थना. 
 
 मंगेश कुडले
 माजी विद्यार्थी
 माजी पालक 
 न्यू इंग्लिश स्कूल,टिळक रोड

मंगेश कुडले
मंगेश कुडले

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वामन शिवराम आपटे , महादेव बल्लाळ नामजोशी व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सुरु केलेल्या आपल्या या शाळेला १४४ वर्ष पूर्ण होत असतानाच, विजयादशमीच्या दिवशी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमात आपली शाळा न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, पुणे विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकात आली या बातमीने खरच मन भारावून गेले.
 
आपला पाल्य या शाळेत शिकतो याचा अभिमान वाटतो. आपल्या शाळेत शिरतानाच प्रथम ब्रीद वाक्य लिहिलेले दिसते, *एकी हेच बळ* हे वाक्य खरे करुन दाखवले. त्या शाळेला आपण शिक्षणाचे मंदिर म्हणतो. म्हणून शाळेत शिरताना अगदी विद्यार्थ्यांबरोबरच सर्व शिक्षकवर्ग सुरूवातीला नमस्कार करुन मगच शाळेत येतात, हे मी पाहत आले आहेत. ही शाळा म्हणजे शिक्षणाचे मंदिर तर आहेच पण स्वांतंत्र्योत्तर काळातील ते विद्येचे घर आहे. आता अशा या विद्येच्या घराला सर्वांच्याच अथक प्रयत्नांनी, परिश्रमाने बक्षीस मिळाले आहे.

 या शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनिता राव मॅडम, पर्यवेक्षक वरगंटीवार सर, शाळेतील अखंड परिश्रम घेणारे शिक्षक वर्ग  तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन.आपल्या या शाळेची परंपरेने चालत आलेली गुणवत्ता, संस्कार तसेच शिस्त ही आज या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात समर्थपणे जपली. त्यासाठी तुमच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार.त्यामुळेच आता आपल्याला हा दिवस साजरा करता आला.
 

तुम्ही सर्वांनी व पालकांनीदेखील विद्यार्थ्यांना जेव्हा शाळा पाहणी केली तेव्हा रविवार असून सुद्धा पाठवून..एकी दाखवून दिली ती सर्व मिळून केलेली मेहनत सार्थकी लागली. यात तुमचे काम करताना रुसवे फुगवे झाले असतील, समजून देणे व समजूत काढणे हे प्रकार पण झाले असतीलच पण ह्या अशा सर्व कठीण प्रवासाचे फळ हे आपल्याला पारितोषिकाच्या स्वरुपात गोड मिळाले आहे.इथपर्यंतचा तुमचा सगळ्यांचा प्रवास खूप कठीण आणि श्रमदायी होता पण तो तुम्ही कसोशीने पूर्ण केलात. तुमच्या घरून देखील तेवढीच साथ मिळाली असेल त्या सर्वांसाठी पुनश्च एकदा खुप खुप अभिनंदन आणि कौतुक.अशाच पध्दतीने आपल्या या शाळेचे परंपरेने चालत आलेले कामकाज त्यातील संस्कार, शालेय शिबिर तसेच अभ्यासातील सातत्य या सर्वाचे नाव पूर्ण भारत व भारताबाहेर पसरू दे व अशीच अजून कौतुकाची थाप आपल्या शाळेला मिळू दे;यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप कौतुक.

विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांची उतोरोत्तर प्रगती करण्यासाठी तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा.
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून त्रिवार अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
 
सौ मधुरा प्रशांत कर्वे.
पालक प्रतिनिधी ८ अ २०२४-२५

 

 

 

 

 

 श्रीमती. मधुरा कर्वे
श्रीमती. मधुरा कर्वे

शाळा म्हणजे केवळ ज्ञानदानाचं केंद्र नव्हे, तर ती संस्कारांची गंगोत्री आहे, जिथे प्रत्येक विद्यार्थी आपल्या आयुष्याचा मजबूत पाया घालतो. पुण्याच्या ऐतिहासिक व शैक्षणिक वैभवात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड ही शाळा म्हणजे गुणवत्तेचं एक उत्तुंग शिखर आहे. इथल्या भव्य इमारतींमध्ये केवळ भौतिक रचना नाही, तर गुरु -शिष्य याच्या नात्याने समृद्ध झालेलं वातावरण आहे. या शाळेचा पाया मजबूत करण्यामागे अनेक महान व्यक्तिमत्त्वांची विचारधारा आहे. त्यांच्या वारसा घेत इथे प्रत्येक विद्यार्थी स्वताः ला सिद्ध करीत आहे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होऊन शाळेशी जोडलेले आहेत वेळ मिळेल तेव्हा शाळेत येत असतात येथील शिक्षक केवळ ज्ञानार्जन काम करून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत नसून अनुभवात्मक शिकवणुकीचा एक सुंदर प्रवास करत असतात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचे व्यक्तिमत्त्व उजळावे, त्यांची बुद्धिमत्ता आणि सृजनशीलता बहरावी या ध्येयाने प्रेरित होऊन शाळेने कायमच दर्जेदार शिक्षण देण्याचा वसा घेतलेला आहे. केवळ अभ्यासातच नव्हे, तर कलेपासून क्रीडाप्रेमी, विज्ञानाच्या प्रयोगशीलतेपासून समाजसेवेच्या जबाबदारीपर्यंत, न्यू इंग्लिश स्कूल प्रत्येक विद्यार्थ्याला जीवनाची समृद्धता शिकवते. येथे संस्कार आणि शिस्त ही पुस्तकी ज्ञानाइतकीच महत्त्वाची मानली जाते. दहावीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही शाळा प्रेरणादायी ठरते. 

या शाळेने वेळोवेळी मिळवलेली पारितोषिकं ही केवळ चकाकणारी पदके नाहीत, तर अथक प्रयत्नांची, शिक्षकांच्या मार्गदर्शनाची आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीची साक्ष आहेत. शिक्षणाच्या या पवित्र गाभाऱ्यात उभा असताना प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या भविष्याचा विश्वास वाटतो, आत्मविश्वास मिळतो . या वर्षीच्या "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, स्वच्छ शाळा" स्पर्धेमध्ये आपल्या शाळेने महाराष्ट्रभरात उल्लेखनीय यश संपादन केले. ही स्पर्धा विविध टप्प्यांमध्ये विभागली होती, जिथे शाळेच्या सौंदर्याकरणापासून स्वच्छतेपर्यंत, विद्यार्थी सहभागापासून शिक्षकांच्या मार्गदर्शनापर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने परीक्षणास घेतली जात होती. विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि मेहनत यांची सांगड घालून शाळेच्या स्वच्छतेत आणि सौंदर्यात भर टाकली. शिक्षकांच्या प्रेरणेने आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाने प्रत्येक टप्पा पार करत अखेरीस आपल्या शाळेने यशाची शिखरं गाठली.

टिळकांच्या या पुण्यभूमीत, अखंड ज्ञानदीप तेवत राहो,न्यू इंग्लिशच्या प्रांगणातील, तेजस्वी वारसा वाढत राहो.
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड म्हणजे केवळ एक शाळा नव्हे, तर ते एक शैक्षणिक मंदिर आहे—जिथे ज्ञान, कर्तव्य, आणि स्वप्नांची पूर्ती यांचा संगम घडतो . विद्यार्थ्यांच्या तेजस्वी यशाने आणि शिक्षकांच्या निःस्वार्थ सेवेने ही शाळा सतत प्रगती करत राहो . यशाच्या मार्गावर अविरतपणे आगेकूच करणाऱ्या या विद्येच्या गंगोत्रीला उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
 
 धन्यवाद !!
 
 सौ.किरण ओसवाल
 पालक शिक्षक संघ २०२४-२५

 

 श्रीमती किरण ओसवाल
श्रीमती किरण ओसवाल


 आपली शाळा न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे एक जिव्हाळ्याचे नाते आज मनात अनेक आठवणी दाटून आल्या आहेत आपल्या शाळेची पालक म्हणून तुमच्याशी हा लिखित संवाद साधते आहे
 ५ वी ते १० वी गेल्या सहा वर्षांचा शाळेबरोबरचा सहवास , ही वर्ष खूप झरझर संपली.
  
 गेले काही दिवस मन सतत गेल्या सहा वर्षांचा मागोवा घेत होते अपेक्षेपेक्षा खूपच कमी वेळात शाळा आपलीशी झाली वर्षानुवर्षांची ओळख असावी असच वाटलं. मला २०१९ सालचे मार्च ,एप्रिलचे दिवस अजूनही लख्ख आठवतात  शाळा शोधताना इतर शाळांपेक्षा आपल्या शाळेची केलेली कठोर चाचपणी , काटेकोर तपासणी .... खरंतर या सगळ्याची गरज नव्हती पण तेव्हा कुठं हे ठाऊक होते, आता कळतंय.... मडकं कच्च का पक्क याची पूर्ण शहानिशा करून मगच ५ वी साठी प्रवेश घेतला होता आणि इथे शाळेत घालायचा निर्णय किती योग्य होता हे वेळोवेळी सिद्ध होत गेलं. सुरुवातीची एक आठवण आठवतेय शाळा सुरू होऊन जेमतेम चारपाच दिवस झाले असतील आणि शाळेतून एका बाईंचा निरोप आला की भेटायला या. मला कळेना का बोलावलं  त्यांना भेटले तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या की तुमचा मुलगा खूप हुशार आहे त्याला आपण सगळ्या बाजूंनी प्रयत्न करून पुढे नेऊया , तुम्हाला चालेल का?  मी ऐकतच राहिले , चार दिवसात ह्या मला असं विचारून परवानगी मागत आहेत म्हणजे किती पारख असेल हे कळलं आणि हे त्यांनीच एकट्यानी नाही तर इतर शिक्षकांनी ही केलं आणि असे अनेक अनुभव येत गेले , शिक्षकांची तळमळ दिसून आली तेव्हा कळलं की इथलं रसायन काही वेगळंच आहे.

खूप काही करता आले असते पण मध्येच लॉकडाऊन आले ... लॉकडाऊनमधली ऑनलाईन शाळाही उत्तम होती. तुम्हा सगळ्या शिक्षकांचे कसब खूप जवळून बघता आले. नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेत उत्तम प्रकारे शिकवत होतात. अगदी दोन मुले जॉईन असली तरी शिकवायचात या निमित्ताने तुम्हा शिक्षकांची शिकवण्याची शैली, पद्धत लक्षात आली घरातल्या प्रत्येकाला आपल्या मुलाचे शिक्षक कसे आहेत कळलं शाळेची एवढी पारदर्शकता या आधी कधीच कोणाला अनुभवता आली नव्हती. हा ऑनलाईन शाळेचा खूप मोठा फायदा होता. त्यानंतर प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर तुमच्यासाठी कसोटीची वेळ होती. जवळपास ते वर्ष मुलांना अगदी अक्षरओळख करून देण्यापासून लिखाणाची सवय पूर्ववत करण्यात गेलं  वेळप्रसंगी शिकवणे बाजूला ठेवून मुलांनी सुधराव यासाठीही तुम्ही मेहनत घेतली , योग्य संस्कार केले हा काळ तुमच्यासाठी जास्त कठीण होता असे आता वाटते  त्यानंतर उपक्रम , स्पर्धा, परीक्षा अशा गोष्टी सुरू झाल्या त्या नीट होण्यामागची तुमची धडपड दिसून यायची ,अजूनही येते  या वर्षी तर प्रकर्षाने जाणवलं की शिक्षकपणही काही सोपी गोष्ट नाही  मुलांना शिकवणे, परीक्षा घेणे, पेपर तपासण ही काम तर आहेतच पण त्याखेरीज सगळी माहिती अद्ययावत करणे , अनेक इन्स्पेक्शन,त्याची तयारी, शाळेच्या वेळा सोडून जास्त वेळ थांबणं, सुट्टीच्या दिवशी ही शाळेत येऊन काम करणं, वेळ प्रसंगी जिथे आवश्यक तिथे बाहेर जाऊन काम करणं त्यात भरीस भर म्हणून महावाचन प्रकल्प, निवडणुक कामकाज, अपार आयडी चे काम....

म्हणजे ना ही अवांतर कामांची यादी संपतच नाही.....  खरचं या सगळ्यात घर आणि शाळा दोन्ही सांभाळणं कठीण होत असेल ..... तरी ही तुम्ही आपल्या शाळेसाठी , मुलांसाठी सतत काही ना काही करत असता त्यासाठी सलाम (hatsoff).
 

यावर्षी तुमच्या या सगळ्या कामाची दखल घेतली गेली आणि पोचपावतीच्या स्वरूपात मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा या उपक्रमात विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला ही खरचं खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्या शाळेतील माझा सहभाग ही मात्र माझ्यासाठी अजूनही अनाकलनीय बाब आहे. ५ वीत असताना मी मैत्रेयला फक्त सोडायला यायचे आणि पाचदहा मिनिट गेटजवळच्या झाडाच्या पारावर बसायचे आणि परत जायचे  आतमध्ये शाळेत काय चालू असेल याच कधीच कुतूहल वाटलं नाही  पण शाळेच्या मनात आधीच काहीतरी ठरलं होते.....ती जणू वाटच बघत होती  त्या पारावरून व्यासपीठावर नेण्याचा तो प्रवास होता. जो मलाही माहित नव्हता  माझ्याही नकळत अगदी बोट धरून आणावं तशी शाळा मला शाळेच्या आत घेऊन आली एकेका उपक्रमात सहभागी करत गेली मग ती सहल असो , स्नेहसंमेलनातील काव्य वाचन , अभिवाचनासारखे कार्यक्रम असो , सूत्र संचालन असो की अजून काही काही ...खरतर मला काहीच येत नव्हते पण तरी ती संधी देत गेली  पुढे पुढे नेत गेली जणू मला घडवायचा मक्ताच तिने घेतला होता  या वर्षी सगळ्यातून अलिप्त व्हायचं ठरवलं होते , थोड लांब व्हायच होते म्हणजे दहावी संपताना त्रास होणार नाही  पण तिने पालक शिक्षक संघाची सहकार्यवाह करून अजूनच गुंतायला लावले मानाने व्यासपीठावर नेऊन बसवलं ...
  
उभ्या आयुष्यात एवढा मान कोणी दिला असेल तर तो शाळेने आणि तुम्ही सगळ्यांनी  आणि माहेरच्या घरानंतर आपुलकीने खाऊपिऊ व जेवायला घालणार कोण असेल तर ती शाळा आणि तुम्ही सगळे 
एवढं कोणी करत का आपल्या शाळेतल्या एका विद्यार्थ्याच्या आईसाठी ? पण हो ,आपल्या शाळेने - न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे हिने ते केलं  आम्हा पालकांना तिने घडवलं .ह्या ऋणांची कधीच उतराई होणे नाही...
  

शाळेशी , तुम्हा सगळ्यांशी ऋणानुबंध जुळले आहेत ते कधीच संपू नयेत असे वाटत आहे .
पण आता निरोपाची वेळ आली आहे  मनाच्या गाभाऱ्यात खळबळ माजली आहे  अनेक आठवणींची रेलचेल झाली आहे 
शाळेने , तुम्ही सगळ्यांनी आयुष्याच्या ओंजळीत मोजता न येणाऱ्या समाधानाची ऊब दिली आहे
त्या समाधानाने भरलेल्या ओंजळीला घेऊन इथून बाहेर पडायचे आहे , अवघड आहे........

 सौ.रुपाली देशमुख. 

पालक शिक्षक संघ कार्यकारिणी २०२४-२५

 

श्रीमती. रुपाली देशमुख.
श्रीमती. रुपाली देशमुख.